माझी आई : नित्य नूतन, टवटवीत आठवण...

 माझी आई : नित्य नूतन, टवटवीत आठवण...

          आई म्हणजे काळजाचा असा एक हळवा कोपरा, जिथे आठवणींची पालवी कधीच सुकत नाही; उलट प्रत्येक वाहणाऱ्या श्वासासोबत ती अधिकच ताजी आणि टवटवीत होत जाते. आज ती आम्हा भावंडांना सोडून देवाघरी जाऊन १७ वर्षे उलटून गेली. काळाच्या ओघात वर्षं झरझर मागे पडत गेली, पण तिचं असणं आजही घराच्या कानाकोपऱ्यात आणि आमच्या मनात अगदी काल-परवासारखंच जिवंत आहे.

          आम्ही पाच भावंडे— ताई, आका, मी बाळू, न्हानू आणि पपी... आज तिच्याच पुण्याईने आणि आशीर्वादाने आपापल्या संसारात समाधानात आहोत, सुखात आहोत. पण हे सुख, हे स्थैर्य आणि यश अनुभवताना आजही प्रत्येक क्षणी डोळे नकळत तिलाच शोधतात. जिच्या कष्टांवर, त्यागावर आजचे हे समाधानाचे दिवस उभे राहिले, ती माऊली आज कौतुकाने पाहायला आमच्यासोबत हवी होती, ही रुखरुख काळजात कायमची घर करून राहिली आहे.

          अथांग सहनशीलता हेच तिचं रूप होतं. आम्ही बालपणी कितीही खोड्या केल्या, तरी तिच्या मुखातून कधी मनाला टोचेल असा शब्द बाहेर पडला नाही. तिचा सहवास म्हणजे जणू मायेची उबदार सावली. दिवसभराच्या धावपळीनंतर तिच्या कुशीत शिरायला आम्हा भावंडांमध्ये अक्षरशः चढाओढ लागायची. त्या मायेच्या उबेत जगातील सारे भय आणि थकवा क्षणात विरून जायचा. तिने स्वतःची दुःखं, वेदना कधी चेहऱ्यावर उमटूच दिल्या नाहीत; ओठांवर कायम एक शांत, तृप्त हास्य ठेवून सर्वांना आनंदी ठेवण्याचा तिचा ध्यास असायचा. स्वतःचे अश्रू लपवून जगायचं तर हसतमुखानेच, हा आयुष्य जगण्याचा अनमोल मंत्र तिने स्वतःच्या आचरणातून आम्हा सर्वांना दिला.

          दिसायला अत्यंत साधी, पण अंतःकरणाने श्रीमंत असलेली आमची आई उगाच शब्दांचा पसारा मांडत बसणारी नव्हती. ती कमी बोलायची; खूप चर्चा करत बसण्याचा तिचा स्वभाव नव्हता, पण तिचं शांतपणे अविरत काम करत राहणं आणि न बोलताही डोळ्यांतून माया पाझरणं आम्हाला आयुष्याचा खरा अर्थ शिकवून गेलं. जगाशी प्रेमाने, सलोख्याने कसं वागावं, हा संस्कार तिने सहजतेने आमच्या मनात रुजवला. आजही तिच्या आठवणीने अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. आजच्या या भरल्या संसारात नातवंडांचा गलबला पाहिला, की मनात येतं— आज आई असती, तर नातवंडांना छातीशी कवटाळून तिच्या चेहऱ्यावर उमललेला तो आनंद किती देखणा असता! रोज रात्री डोळे मिटताना तिचं स्मरण करणं, तिच्या आठवणींचा नामजप करणं हा आजही माझ्या जगण्याचा नित्यनेम आहे. डोळे मिटून आईला आळवलं की संसारातील सारे ताण, साऱ्या चिंता दूर पळतात आणि तिच्या कुशीत निजल्यासारखी गाढ, शांत झोप लागते.

          हातगुणात तर माझी आई साक्षात अन्नपूर्णा होती. उसळ, गरमागरम चपाती, भाकरी, खमंग पुरणपोळ्या, आम्ही आवडीने ज्याला ‘सार’ म्हणायचो ती टोमॅटोची आंबट-गोड आमटी, फोडणीचा भात, पिठी आणि अस्सल चवीचे वडे-सागोती... ती जे काही रांधायची, त्यात अमृताची चव असायची. घरात जे काही मोजकं असेल, त्यातही ती लेकरांना कधी काही कमी पडू देत नसे. इकडे तिने पदार्थाची पंगत मांडली रे मांडली, की आम्ही भुकेल्या वासरांसारखा त्यावर ताव मारायचो. कधी कधी खाण्याच्या नादात आम्ही तिच्या वाटणीचे घासही संपवून टाकायचो; पण तिच्या डोळ्यांत राग नसायचा, उलट पोटभर जेवलेल्या लेकरांकडे बघून ती तृप्त व्हायची आणि मायेने म्हणायची, “तुम्ही जेवलास ना, मग माझंही पोट भरलं रे!”

          घरात सगळं काही आहे, खायला-प्यायला कशाचीही वाण नाही; पण त्या घासाला आईच्या हाताची ती मायेची चव नाही, ती तृप्ती नाही. आज जे काही आहे ते तिच्या आशीर्वादाने आहे, पण तिची उणीव जगातील कोणतीही संपत्ती किंवा व्यक्ती कधीच भरून काढू शकत नाही... हेच या आयुष्याचं अंतिम सत्य आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( जयश्री सुत ) 



Comments